मॉब लिंचिंग आणि ‘जय श्रीराम’ वरून पंतप्रधानांना पत्र लिहिले म्हणून ९ दिग्ग्जना कोर्टात खेचले

मॉब लिंचिंग आणि ‘जय श्रीराम’चा नारा दिला नाही म्हणून झालेल्या मारहाणीच्या घटनांवर चिंता व्यक्त करून त्या रोखण्यात याव्यात, अशा मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिणाऱ्या ४९पैकी नऊ दिग्गजांविरोधात बिहारच्या एका कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी ३ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.देशभरात अनेक ठिकाणी मॉब लिंचिंगच्या घटना घडल्या आहेत. तसेच ‘जय श्रीराम’चा नारा देण्यासाठी दबाव आणून तरुणांना मारहाण केल्याच्या घटना घडल्याचेही समोर आले आहे.
या घटनांवरून विविध क्षेत्रातील ४९ मान्यवरांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं. या घटनांबाबत चिंता व्यक्त करत त्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असं आवाहन केलं होतं. बिहारमधील सुधीर ओझा नावाच्या वकिलांनी या ४९ मान्यवरांपैकी ९ जणांविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे. त्यात अपर्णा सेन, रेवती, कोंकणा सेन यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या मान्यवर मंडळींनी जाणूनबुजून देशाची प्रतिमा मलीन केली आहे, असं ओझा यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी ३ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.