माझ्या भाजप प्रवेशाच्या केवळ अफवा , विश्वास ठेवू नका : राणा जगजितसिंह

‘पक्ष सोडण्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या भाजपा प्रवेशाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी दिलं आहे.
‘काही वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रात माझ्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्याचे मला माझ्या कार्यकर्त्यांकडून समजले. पक्ष सोडण्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही व याबाबत पक्ष कार्यकर्ते अथवा कोणत्याही नेत्यांशी माझी चर्चा झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
”उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना रु.५६.६१ कोटी चा विमा देण्याबाबत मा.उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानंतर या दोन्ही तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी बांधवांनी गावोगावी उत्स्फुर्तपणे माझे आभार व्यक्त करण्यासाठीचे बॅनर लावले. राजकारणापलीकडे याचे पूर्ण श्रेय शेतकरी मला देत असल्याने, विरोधकांचा तिळतपाट झाला असून, सामान्य जनतेचे यापासून लक्ष विचलित करण्यासाठी तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात आहेत.
उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील पिक विम्याचा प्रश्न, रखडलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव औद्योगिक वसाहती मधील सौर ऊर्जा प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या व जिल्ह्यातील इतर अनेक महत्त्वाच्या विषयावर मी मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांना अनेक वेळा भेटलो आहे. या भेटींचा मुद्दामहून विपर्यास करण्यात येत आहे.
माझ्या पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार मी सध्या राज्याबाहेर पत्नीच्या निसर्गोपचार, उपचारासाठी आलो आहे. काही वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रात माझ्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्याचे,मला माझ्या कार्यकर्त्यांकडून समजले. पक्ष सोडण्याबाबत मी निर्णय घेतलेला नाही व याबाबत पक्ष कार्यकर्ते अथवा कोणत्याही नेत्यांशी माझी चर्चा झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नवं मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा कार्यक्रम उस्मानाबाद व कळंब शहरामध्ये दि.२८ व २९ जुलै रोजी राबविण्यात येत आहे, या मध्ये देखील युवकांनी सहभागी होऊन नावे नोंदवावीत असे आवाहन करत आहे”.