राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही राजीनामा , प्राथमिक सदस्यत्वही सोडले

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या एका दिवसाने पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन अहिर यांच्याप्रमाणेच चित्रा वाघ यादेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा शुक्रवारी दिवसभर सुरू होत्या. शेवटी त्यांनी राजीनामा दिला आहे. चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तसेच पक्षाच्या प्राथमिक सभासदत्वाचा देखील राजीनामा देत आहे. महाराष्ट्रातल्या महिलांची सेवा करण्याच्या आणि त्यांचा आवाज बनण्याच्या मला दिलेल्या सर्व संधींसाठी मी तुमची(शरद पवार) आभारी आहे’, असं चित्रा वाघ यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात नमूद केलं आहे.
दरम्यान, सचिन अहिर यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीला आणखीही मोठं खिंडार पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामध्ये चित्रा वाघ यांचं नाव आघाडीवर होतं. या चर्चेला पूर्णविराम देत चित्रा वाघ यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर आमदार वैभव पिचड हे देखील राजीनामा देऊन पक्षांतर करणार असल्याचं वृत्त खात्रीलायक सूत्रांनी दिलं आहे. कालिदास कोळंबकर यांनी तर आपलं राजीनामा देणं निश्चित झालं असून येत्या ३१ जुलैला सकाळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.