आमदार वैभव पिचड यांचंही ठरलं !! भाजप प्रवेशाचा निर्णय निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरूच असून आता पक्षाचे अकोले येथील आमदार वैभव पिचड पुढील आठवड्यात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये ठरल्यानुसार सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. हे सर्वजण पिचड यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे , बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनीही अजितदादा पवार यांच्या बैठकीला दांडी मारल्याने भाजपचे नेते चिंतीत झाले आहेत .
मुंबईत काल सचिन आहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज अकोल्यात पिचड यांच्या हालचालींना वेग आला. त्यांनी पूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळेच काल पक्षाच्या नगरला झालेल्या मुलाखतींना पिचड गेले नाहीत. त्यानंतर आज बैठक होऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याकडे राजीनामे पाठवून दिले. माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार पिचड जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशा भावना प्रमुख कार्यकर्त्यांनी बैठकीत बोलून दाखविल्या.
उद्या शनिवारी पंकज लॉन्स येथे अकोले तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव यांनी दिली. कार्यकर्त्यांचा मेळाव्या नंतर आमदार पिचड आपला निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते. मंगळवारी (३० जुलै) मुंबई येथे मुख्यमंत्र्याच्या उपस्थित भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रानी दिली.