Loksabha 2019 : तीन तालाकच्या कायदेशीर बाबींवर ओवीसींनी गाजवली आणि हसवली लोकसभा !!

तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेमध्ये मंजूर झाले. त्याआधी या विधेयकाबद्दल लोकसभेमध्ये बोलताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेमध्ये भाजपावर सडकून टिका केली. मुस्लिम महिलांबद्दल तिहेरी तलाकच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करणाऱ्या मोदी सरकारला ओवेसींनी चांगलेच सुनावले. याच भाषणादरम्यान ओवेसींनी इस्लाममधील विवाहासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावर गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनाही अगदी खदखदून हसू आले.
‘नव्या कायद्याअंतर्गत अटक झालेला नवरा पत्नीला तुरुंगात राहून भरपाई कशी देणार? पती तीन वर्ष तुरुंगात असेल तर पत्नीने तीन वर्ष लग्नाच्या बंधनात का रहावे? हा महिलांवर अन्याय नाही का?’ असे सवाल ओवेसी यांनी उपस्थित केले. ‘त्या महिलेचा पती तुरुंगात असणार आणि तिने त्याची वाट पाहत रहायचे. त्या स्त्रीला त्या लग्नातून बाहेर पडण्याची संधी या काद्यात द्यायला हवी जी सरकारने दिलेली नाही’ असे निरिक्षण ओवेसी यांनी नोंदवले. या भाषणामध्ये पुढे बोलताना ओवेसींनी इस्लाममधील लग्नाची संकल्पना समजावून सांगितली.
‘इस्लाममध्ये लग्न हे सात जन्म एकत्र राहण्यासाठी नसून ते एक कॉनट्रॅक्ट आहे. ते एका जीवनापुरते आहे. आणि तुम्ही म्हणताय की ते सात जन्मासाठी ठेवा. नकोय बाबा आम्ही आहोत त्यात खूश आहोत,’ असं ओवेसी म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. त्यावर ओवेसी यांनी हजरजबाबीपणा दाखवत, ‘बघा इथे सगळेच विवाहित आहेत. सर्वांना घरी काय अडचणी असतात हे ठाऊक आहे’ असे मजेशीर वक्तव्य केले. ओवेसी यांच्या या वक्तव्यावर गृहमंत्री अमित शाह आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याबरोबरच इतर सर्वच मंत्री खदखदून हसले.
जुलै २०१८ मध्ये सर्वोच्च कोर्टाने मॉब लिंचिंग विरोधात कायदा बनवा असे सरकारला सांगितले होते. तो कायदा अजूनपर्यंत तयार करण्यात आला नाही अशी आठवणही ओवेसींनी करुन दिली. ‘मुस्लिमांना त्यांच्या धर्म आणि परंपरेंपासून दूर करण्यासाठी हा तिहेरी तलाक कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्याने मुस्लिम महिलांवर अन्यायच होणार आहे म्हणून मी त्याचा विरोध करतो,’ असं सांगत ओवेसींनी आपले भाषण संपवले. मोदी सरकारने भाजपाच्या सर्व महिला खासदारांना विशेष विमानाने शबरीमाला मंदिरामध्ये घेऊन जावे असा टोला ओवेसी यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी विशेष विमानाने भाजपाच्या महिला खासदारांना शबरीमालाला न्यावे असं ओवेसी यांनी भाजपाला सुनावले आहे.