संतापजनक : अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून , आरोपी गजाआड

पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी पीडित मयत मुलीच्या नातेवाईकाला सांगवी पोलिसांनी जेरबंद केले आहे. दरम्यान, आरोपीने अश्लील चित्रपट बघून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली सांगवी पोलिसांना दिली आहे. या घटनेप्रकरणी अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी मयत अडीच वर्षीय मुलगी राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. मध्यरात्री आईला जाग आल्यानंतर मुलगी जागेवर नसल्याचे लक्ष्यात आले. त्यानंतर आरोपी नातेवाईक, आई वडील यांनी परिसरात बेपत्ता मुलीचा शोध घेतला. मात्र काही तासांच्या शोधकार्यानंतर मुलगी भेटत नसल्याने सांगवी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी परिसर पिंजून काढत सर्वत्र शोध घेतला. परंतु, ती सापडत नव्हती. त्यानंतर पीडित मुलीच्या घरामागे मिलिटरी सीमा भिंतीच्या पलीकडे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात मुलीचा मृतदेह तरंगत असलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने मुलीचा मृतदेह औंध जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.
मुलीवर लैंगिक अत्याचार करून गळा आवळून खून केला असल्याचा अहवाल सांगवी पोलिसांच्या हाती आला. त्यानंतर सांगवी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संबंधित घटनास्थळावरून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी एकावर पोलिसांचा संशय बळावला होता. मोबाईलच्या तांत्रिक बाबी तपासून त्याच्याकडे विचारणा करण्यात आली. मात्र तो काही बोलत नव्हता. त्यानंतर मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तो घडघडा बोलू लागला. त्याने दिलेल्या कबुली जबाबात धक्कादायक माहिती समोर आली. घटना घडण्याच्या अगोदर आरोपी हा दोन ते तीन तास मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पहात होता. त्यानंतर त्याने हे अमानवी कृत केल्याची कबुली त्याने पोलीस ठाण्यात दिली आहे.