मोदी सरकार -२ : नड्डा सांगताहेत सरकारचे “गोल्डन ज्युबली ” निर्णय !!

केंद्रातील मोदी सरकारने दुसऱ्या पर्वात ५० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला असून भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या ५० दिवसांच्या कारभाराचं ‘रिपोर्ट कार्ड’ आज माध्यमांपुढे ठेवलं. ५० दिवसांत सरकारने घेतलेले निर्णय गेल्या ५० वर्षांत घेतलेल्या निर्णयांपेक्षा उजवे आहेत, असा दावा यावेळी नड्डा यांनी आतापर्यंत सरकारचा १०० दिवसांचा प्रोग्रेस रिपोर्ट दिला जात होता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुढे ५० दिवसांचा रिपोर्ट देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसारच हे रिपोर्ट कार्ड मी आपल्यापुढे ठेवत आहे, असे नड्डा यांनी नमूद केले.
पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य डोळ्यापुढे असून विकासाच्या मार्गावर चालण्याचा निर्धार सरकारने केला आहे. सरकारने आपल्या नव्या पर्वात पहिल्या ५० दिवसांत कमकुवत वर्गावर लक्ष्य केंद्रीत केलं. ग्रामीण भारतातील प्रत्येक गावात २०२४ पर्यंत शुद्ध पाण्याची योजना हे क्रांतिकारक पाऊल आहे, असे नड्डा म्हणाले. ‘प्रधानमंत्री ग्रामसडक योजने’च्या माध्यमातून १.२५ लाख किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल. २०२२ पर्यंत १ कोटी ९५ लाख घरांना गॅस, शौचालय आणि शुद्ध पाणी देण्याचे वचन आम्ही पूर्ण करणार आहोत. मजुरांना निवृत्तीच्या वयानंतर ३ हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याचा निर्णयही महत्त्वाकांक्षी आहे, असे नड्डा पुढे म्हणाले.