राज्यात तापाचे रुग्ण वाढले , राज्य शासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

पावसाळा सुरु होताच त्या पाठोपाठ राज्यात डेंग्यू, मलेरिया, हिवताप, स्वाईन फ्लू सोबतच जपानी मेंदूज्वर शिवाय चंडीपुरा या आजारांचं प्रमाण वाढत चालले आहे. सध्या या आजारांमुळे नागरिक हैराण झाले असताना राज्याच्या आरोग्यविभागाकडून या आजारांवर प्रतिबंध घालता यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकीकडे स्वाईन फ्लू, लेप्टो, डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी झाले असल्याची माहिती देत असताना दुसरीकडे राज्यात हिवताप, माकडताप आणि मेंदूज्वराचे रुग्ण वाढले आहेत. तर, मेंदूज्वराच्या अनेक प्रकार असलेले रुग्ण ही छुप्या पद्धतीने वाढत आहेत.
प्राप्त माहितीनुसार राज्यात १ हजार ९१७ जणांना जानेवारीपासून ते जुलैपर्यंत स्वाईन फ्लूची लागण झाली असून यात १९२ मृत्यू झाले आहेत. पण, ही आकडेवारी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. आरोग्य खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, हिवताप, माकडताप आणि मेंदूज्वर या आजारांचे वाढते प्रमाण दिसून येत आहे. राज्यात हिवतापाचे २ हजार ७९७ रुग्ण आढळले आहेत. तर, एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत ७१ जणांना लेप्टोची लागण झाली आहे. स्क्रब टायफसची ९ जणांना, डेंग्यूच्या १ हजार ५५६ रूग्णांची आणि दोघांच्या मृत्यूंची नोंद केली आहे. त्याखालोखाल चिकनगुनिया २६० आणि जपानी मेंदूज्वराच्या ७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, इतर मेंदूज्वराच्या ६४ रुग्णांची नोंद झाली आहे. माकडतापाचे ८२ रूग्ण आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे सरकार साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे मेंदूज्वर हा आजार हळूहळू राज्यात डोकं वर काढत असल्याचे चित्र आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आरोग्य अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत साथरोग नियंत्रणाबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला. यात साथरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. शिवाय, यंत्रणांच्या नेमक्या काय अडचणी आहेत त्याही समजावून घेतल्या.
स्वाईन फ्लूची लक्षणे दिसताच उपचाराला उशीर करू नका, असे स्पष्ट निर्देश खासगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टरांना देण्यात आले आहे. महाराष्ट्राने स्वाईन फ्लूवरील उपचाराचा आणि रुग्ण व्हेंटीलेटवर ठेवण्याचा जो प्रोटोकॉल तयार केला. तो देशात सर्वोत्तम असून आता केंद्र शासन त्याचा अंगिकार करून संपूर्ण देशात लागू करणार असल्याचे आरोग्यमत्र्यांनी सांगितले. तसेच, आयएमए खासगी हॉस्पिटल संस्था, डॉक्टर मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी. डास उत्पत्तीवर प्रतिबंध घातला पाहिजे. सोशल मीडिया, होर्डींग, बॅनर्स, सिनेमागृह अशा सार्वजनिक ठिकाणांवरून प्रचार केला पाहिजे असे ही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.