धाडसी महिला : चाकूचे तीन वार झेलूनही तिने चोरट्याला पिटाळून लावलेच !! पुण्यातील घटना

घरात घुसलेल्या चोरट्यानं तीन वेळा चाकूने भोसकूनही महिलेनं धैर्यानं प्रतिकार करत त्याला पळवून लावलं. पुण्यातील हिंजेवाडीत मंगळवारी भरदुपारी हा थरार घडला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला असून, त्यानं रुमालानं चेहरा झाकला होता. या प्रकरणी हिंजेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हिंजेवाडीतील साखरे वस्तीत पाच मजल्यांच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर हुलावले कुटुंब राहतं. सीमा हुलावले (वय ४१) या काल मंगळवारी दुपारी बेडरुममध्ये झोपल्या होत्या.
झोपण्यापूर्वी त्यांनी दरवाजा लॉक केला नाही. त्यांचे पती दोन मुलांसह बाणेरला काही कामासाठी गेले होते. साधारण पावणेचारच्या सुमारास चोरटा घरात घुसला. त्यानं हुलावले यांना झोपेतून उठवलं. आरडाओरड केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यांनी बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यानं त्यांच्या उजव्या हातावर चाकूने वार केला. त्यानंतर त्यानं आणखी दोन वार केले. त्या वेदनेनं विव्हळत होत्या. मात्र, त्यांनी चोरट्याचा जोरदार प्रतिकार केला. त्यांनी चोरट्याच्या जोरानं लाथ मारली. त्यामुळं तो खाली पडला. त्यानंतर रागानं चोरट्यानं त्यांच्या मानेवर चाकू ठेवला. पण त्यांनी न घाबरता चोरट्याला ढकलून दिलं. त्यानंतर तो कपाट उघडण्यासाठी गेला. त्याचवेळी प्रसंगावधान राखून त्यांनी खिडकी उघडली आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. हुलावले यांचे रौद्ररुप पाहून चोरट्यानं त्यांना पुन्हा बेडरुममध्ये बंद केलं आणि घरातील कोणतीही वस्तू न घेता तेथून पलायन केलं.
हुलावलेंची पुतणी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहते. हुलावले मदतीसाठी आरडाओरडा करत असल्याचं लक्षात येताच ती पहिल्या मजल्यावर आली आणि तिनं बेडरुमचा दरवाजा उघडला. त्यानंतर इमारतीतील इतर रहिवाशांना माहिती दिली. ते घरी आले आणि त्यांनी जखमी हुलावले यांना रुग्णालयात हलवले. तसंच पोलिसांना घटनेची माहिती दिली. चोरट्यानं सफेद रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट घातली होती. तो मराठी भाषेत बोलत होता. त्यानं रुमालानं चेहरा झाकला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला आहे, अशी माहिती सीमा हुलावले यांचे पती रंगनाथ यांनी दिली.