Mob Lynching : मला ‘अल्ला हो अकबर’ ची जबरदस्ती आवडणार नाही तशी “जय श्रीराम”चीही सक्ती होऊ नये : अपर्णा सेन

एखाद्या मुद्द्यावर पंतप्रधानांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली वा सरकारवर टीका केली म्हणजे कुणी देशद्रोही ठरत नाही, अशा शब्दांत अभिनेत्री आणि चित्रपट निर्माता अपर्णा सेनयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. देशातील वाढच्या झुंडबळीच्या घटना आणि ‘जय श्रीराम’ म्हटले नाही म्हणून झालेल्या मारहाणीच्या घटनेवर चिंता व्यक्त करत विविध क्षेत्रांतील ४९ मान्यवरांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. अशा घटना रोखण्यासाठी तत्काळ ठोस पावले उचलावी व कठोर कायदा करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. हे पत्र लिहिणाऱ्या मान्यवरांत अपर्णा सेन यांचाही समावेश असून त्यांनी या पत्रावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका अधिक स्पष्ट केली.
‘देशात सध्या दलित आणि अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला आहे. झुंडबळीच्या बातम्या सातत्याने टीव्हीवर पाहायला मिळत आहेत. गायीवरून हत्या होऊ लागल्या आहेत. हे सगळंच गंभीर आणि चिंताजनक असून याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही हे पत्र लिहिले आहे’, असे सेन यांनी नमूद केले. पंतप्रधानांना पत्र लिहिले म्हणून आमच्यावर देशद्रोहाचं लेबल लावण्याचा अधिकार कुणालाही नाही. देशातील धर्मनिरपेक्ष नागरिक म्हणून आम्ही आवाज उठवत आहोत, असेही सेन यांनी पुढे नमूद केले. गायींची अवैध वाहतूक होत असल्यास संबंधिताची पोलिसांकडे तक्रार न करता, थेट कायदा हातात घेऊन झुंडबळी घेतला जातो, त्यास आमचा आक्षेप आहे. मी हिंदू आहे आणि मला कुणी ‘अल्ला हो अकबर’ म्हणण्यासाठी जबरदस्ती करणार असेल तर कदाचित मला ते आवडणार नाही. ‘जय श्रीराम’ बाबतही तसंच आहे. ते म्हणण्यासाठी कुणावर जबरदस्ती होऊ नये, असे माझे मत आहे. आपल्या देशात वेगवेगळा धर्म मानणारे लोक आहेत. त्यांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे, असे सेन म्हणाल्या.