Good News : धावत्या ट्रेन मधून पडून जखमी झालेला सुनील चौहान आतडी हातात घेऊन 10 किलोमीटर चालला आणि वाचलाही !!

धावत्या ट्रेनमधून पडल्यानंतर बचावण्याची शक्यता फार कमी असते. अशा अपघातातून प्राण वाचल्याची तुम्हाला फार कमी उदहारणे सापडतील. उत्तर प्रदेशातील सुनील चौहान (38) या तरुणाने दाखवलेली हिम्मत खरोखर कौतुकास्पद आहे. ट्रेनमधून पडल्यानंतर सुनीलच्या पोटातील आतडे बाहेर आले. त्याने जखम झालेल्या जागेवर शर्ट बांधले व रात्रीच्या अंधारात तब्बल 10 किलोमीटर अंतर चालून जवळचे रेल्वे स्थानक गाठले. त्यावेळी डयुटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सुनीलला लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण बचावले. द न्यूज मिनिट ने हे वृत्त दिले आहे.
सुनीलने त्याचा भाऊ आणि अन्य मजुरांसह आंध्र प्रदेश नल्लोरला जाण्यासाठी उत्तर प्रदेश बलियामधून संघमित्रा एक्सप्रेस पकडली. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास ट्रेनने तेलंगणमधील उप्पल स्थानक सोडले. त्यावेळी सुनील टॉईलेटला जाण्यासाठी आपल्या आसनावरुन उठला. टॉईलेटच्या जवळ असताना सुनीलचा तोल गेला व तो ट्रेनमधून खाली पडला. धावत्या ट्रेनमधून खाली पडल्यानंतर सुनीलचे पोटातील आतडे बाहेर आले.
प्रचंड वेदना होत असतानाही सुनीलने ते आतडे पोटात टाकले व जवळचे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी चालण्यास सुरुवात केली. सुनीलला ट्रेनमधून खाली पडताना कोणीही पाहिले नव्हते. त्याच्या पोटाला गंभीर मार लागला होता. सुनीलने बाहेर आलेले आतडे आत टाकले. जखम झालेल्या भागावर शर्ट बांधले व रात्रीच्या अंधारात जवळचे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी चालू लागला.
हसनपार्थी स्थानकात पोहोचल्यानंतर सुनील तिथे कोसळला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला लगेच वारंगल येथील रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. सुनीलची प्रकृती अजूनही गंभीर असली तरी स्थिर आहे असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.