लोकसभा २०१९ : तिहेरी तलाक विधेयक अखेर लोकसभेत मंजूर

Lok Sabha passes The Muslim Women (Protection of Rights on Marriage) Bill, 2019. pic.twitter.com/At2g6iwjan
— ANI (@ANI) July 25, 2019
लोकसभेत वादळी चर्चेनंतर तीन तलाक विधेयक मंजूर झाले आहे. चर्चेनंतर या विधेयकावर आवाजी मतदान घेण्यात आले असता विधेयकाच्या बाजूने ३०३ मते पडली तर विरोधात ८२ मते पडली. तीन तलाक विधेयकावर आज लोकसभेत जोरदार खडाजंगी झाली. विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या विधेयकावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना विधेयकाचं जोरकसपणे समर्थन केलं. येथे कोणतंही राजकारण, धर्म वा समूदायाचा प्रश्न नसून महिलेचा सन्मान आणि महिलेला न्याय देण्यासाठी तसेच देशातील महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीच हे विधेयक सरकारने आणले आहे, असे प्रसाद यांनी नमूद केले.
या विधेयकाला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला. विधेयकावर मतदान सुरू होण्याआधी निषेध करत जदयु, तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. बीजू जनता दलाने विधेयकाच्या बाजूने मतदान केले.
> सरकारने मांडलेल्या तीन तलाक विधेयकावर विरोधी पक्षांनी सुचविलेले दुरुस्तीचे सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आले.
> मोदी सरकारच्या पहिल्या पर्वातही तीन तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झालं होतं मात्र राज्यसभेत बहुमत नसल्याने या विधेयकाची कोंडी झाली होती.
> याच अधिवेशनात हे विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी ७ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला केला. विरोधक व्होट बँकेच्या राजकारणासाठी या विधेयकाला विरोध करत आहेत. १९८६ मध्ये शाह बानो प्रकरणात काँग्रेसने व्होट बँकेचे राजकारण केले नसते तर कदाचित आज संसदेत हे विधेयक आणण्याची वेळ आमच्यावर आलीच नसती, असा टोला प्रसाद यांनी लगावला. मी राजीव गांधी सरकारचा कायदा मंत्री नसून नरेंद्र मोदी सरकारचा कायदा मंत्री आहे आणि मुस्लिम महिलांना न्याय देण्याच्या भूमिकेवर मी ठाम आहे, असे प्रसाद यांनी निक्षून सांगितले. २० पेक्षा अधिक मुस्लिम राष्ट्रांमध्ये तीन तलाकवर बंदी असताना धर्मनिरपेक्ष भारतात तीन तलाकवर बंदी का नाही?, असा प्रश्नही प्रसाद यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी या विधेयकावर बोलताना लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट श्रीकृष्णाची उपमा दिली. राऊतांनी हा सिक्सर मारला. ज्याप्रकारे श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावून गेले होते, तसंच पंतप्रधान मोदी मुस्लिम भगिनींच्या मदतीला धावून गेलेत, असं राऊत म्हणाले.
तर एमआयएम पक्षाचे खासदार असाऊद्दीन ओवेसी यांनी तिहेरी तलाकमधील पतीला अटक करण्यात येणाऱ्या तरतुदीला कडाडून विरोध केला. तसंच त्यांनी तिहेरी तलाकमधील तरतुदीला विरोध करताना चांगलीच फटकेबाजीही केली त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकला .