एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होणार

तब्बल दोन दशकानंतर एअर इंडियाने पुनहा २७ सप्टेंबर पासून औरंगाबाद उदयपूर विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. एकवीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुन्हा एकदा उदयपूरसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. एकेकाळी राजस्थानला आलेल्या पर्यटकाना थेट अजिंठा लेणी , वेरूळ लेणी आणि दख्खन ताज पाहण्यासाठी औरंगाबाद उदयपूर ही विमान सेवा सुरू होती. औरंगाबाद शहर हे दोन दशकांपूर्वी राजस्थानशी विमानसेवेने जोडलेले होते. त्यामुळे शहरात जयपूर-उदयपूरहून येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या होती. देशांतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळत होती. औरंगाबादला आल्यानंतर जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणीला पर्यटक भेट देत. त्यातून पर्यटन व्यवसायदेखील वाढत असे; परंतु ही विमानसेवा बंद झाली आणि पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला.
वीस वर्षांपासून ही विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. औरंगाबाद उदयपूर विमान सेवा सुरू करण्याची मागणी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून सुरू होती. जेट विमानसेवा बंद झाल्यानंतर १२ जून रोजी दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाची एअर इंडियाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी आणि कार्यकारी संचालक मीनाक्षी मलिक यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी सर्वांनी एकत्रित मागणी केल्याने एअर इंडियाकडून ही विमानसेवा दिवाळीपूर्वी सुरू करण्यासाठी आश्वासन मिळाले होते. या आश्वासनानुसार एअर इंडियाने तीन मार्गावर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात औरंगाबाद उदयपूर विमानसेवेचा समावेश आहे.