अतिरेक्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्ट नेत्यांची हत्या करावी: मलिक

अतिरेक्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्टाचारी राजकारणी आणि नोकरशहांची हत्या करावी, असं धक्कादायक वक्तव्य करत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिकयांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. मलिक यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
कारगिल येथे भाषणादरम्यान राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हे धक्कादायक विधान केलं. ही तरुण मुलं हातात बंदूक घेऊन नाहक आपल्या लोकांना मारत आहेत. पीएसओ, एसडीओंना मारत आहेत. त्यांना का मारत आहात? ज्यांनी तुमच्या देशाला लुटलं त्यांना मारा. ज्यांनी काश्मीरचा खजाना लुटला त्यांना ठार करा. ज्यांनी देश लुटला, काश्मीरचा खजाना लुटला त्यांच्यापैकी कोणी मारलं गेलंय का? बंदूक हातात घेऊन काहीच साध्य होणार नाही, असं सत्यपाल मलिक म्हणाले.
मलिक यांच्या या वक्तव्याचा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी निषेध नोंदवला आहे. संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती जबाबदार असतो. भ्रष्ट नेत्यांची हत्या करणास सांगण्याऱ्या मलिक यांनी दिल्लीत त्यांची काय प्रतिष्ठा आहे, हे एकदा तपासून पाहिलं पाहिजे, असो टोला अब्दुल्ला यांनी लगावला आहे. या आधीही मलिक यांनी कोणताही दहशतवादी मरतो तेव्हा मला दु:ख होतं, असं वादग्रस्त विधान केलं होतं.