निगमबोध घाटावर शीला दीक्षित यांना अखेरचा निरोप

नवी दिल्लीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षितयांना आज साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी राजकारणासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो लोक उपस्थित होते. शीला दीक्षित यांचं शनिवारी दिल्लीच्या एस्कॉर्ट हास्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं होतं. आज दुपारी निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रचंड पाऊस असतानाही दीक्षित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांनी निगमबोध घाटावर गर्दी केली होती. यावेळी यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, अहमद पटेल, कपिल सिब्बल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, सचिन पायलट यांच्यासह काँग्रेस, भाजपसह इतर पक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते.
तत्पूर्वी दीक्षित यांचं पार्थिव निजामुद्दीन येथील त्यांच्या निवासातून काँग्रेसच्या मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर निगमबोध घाटापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘जब तक चांद सूरज रहेगा, शीलाजी का नाम रहेगा,’ अशा घोषणाही देण्यात आल्या. ‘शीला दीक्षित माझ्या पाठी उभ्या राह्यच्या. त्या माझ्यासाठी मोठी बहीण होत्या. मैत्रीण होत्या. त्यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्या नेहमीच स्मरणात राहतील. त्या महान नेत्या होत्या, त्यांना विसरणं कठीणच,’ अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी भावना व्यक्त केल्या.