अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेने महिला ठार , संतप्त जमावाने टिप्पर पेटविले

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला जागेवरच ठार झाली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी टिप्पर पेटवून दिला.
भरधाव वेगाने धावणारी वाहने नेहमीच अपघाताला कारणीभूत ठरतात आणि असाच एक अपघात बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव-जलंब मार्गावर झाला. अवैध वाळू वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने रोडवरील एका दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला ललीता सुपडा जाणे (वय-52, रा .गाडेगाव, बु. ता.जळगाव जामोद) जागेवरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एक जण जखमी असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ललीता जाणे यांची घरी कुणीतरी वाट पाहत असेल परंतु घरी पोहोचण्याच्या अगोदरच काळाने या महिलेवर झडप घातली आणि यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या टिप्परने धडक दिल्यानंतर घटनास्थळी असलेल्या संतप्त जमावाने या टिप्परला पेटवून दिले. भरधाव चालवणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे आहे. अपघातालाच नव्हे तर अशा प्रकारच्या सदोष मनुष्य बळीला नेमके कोण जबाबदार आहे, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.