शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचे दीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. गेली चाळीसहून अधिक वर्षे त्या वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र आणि विद्यार्थी सहायक समितीमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिलांसाठी कार्यरत होत्या. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सुमारे २५० बालवाडी शाळांची निर्मिती झाली. ११ हजारांहून अधिक बालवाडी शिक्षकांना निर्मलाताईंच्या संस्थेने घडवले.
ग्रामीण भागातील मुलांसाठी किशोर छंद वर्ग, फिरते वाचनालय, महिलांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबीर, व्यवसाय प्रशिक्षण, अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कायम झटत राहिल्या. निर्मला पुरंदरे यांच्यामागे पती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मुलगा अमृत व प्रसाद पुरंदरे, मुलगी माधुरी पुरंदरे, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.