Jammu & Kashmir : चर्चेने प्रश्न सोडवायचे नसतील, तर ते कशा पद्धतीने सोडवायचे, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे : राजनाथ सिंह

जम्मू-काश्मीरचा प्रश्न आता लवकरच सुटेल. जगातील कोणतीही ताकद आता आम्हाला रोखू शकत नाही, असं सांगतानाच चर्चेतून प्रश्न नाही सुटला तर तो कसा सोडवायचा हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे, असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला.
जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आले असता राजनाथ सिंह यांनी हा सज्जड इशारा दिला आहे. दहशतवाद प्रश्नी ज्या पद्धतीने संपूर्ण इंटरनॅशनल कम्युनिटी एकत्र येत आहे, त्यामुळे काश्मीरसह संपूर्ण जगाला दहशतवादापासून मुक्ती मिळू शकते, असं राजनाथ सिंह म्हणाले. ‘जर कोणाला चर्चेने प्रश्न सोडवायचे नसतील, तर ते कशा पद्धतीने सोडवायचे, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे,’ असा इशारादेखील राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी दिला. ‘काश्मीर खोऱ्यातील सर्व समस्यांचे निराकरण लवकरच केले जाईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. फुटिरतावादी आणि आंदोलकांबाबत सिंह म्हणाले, की ‘काश्मीरमध्ये जे लोक आंदोलन करत आहेत, त्यांना मी आवाहन करतो, की त्यांना चर्चेसाठी समोर यावे. आधी प्रश्न काय आहे, तो निश्चित करा. त्यानंतर ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.’
दरम्यान, राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्मीरमधील द्रास सेक्टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला भेट देऊन, हुतात्मा जवांनाच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी ‘वीर भूमी’लादेखील भेट दिली. सीमा रस्तेसंघटनेच्या वतीने कथुआमधील उंज आणि सांबा जिल्ह्यातील बसन्तर येथे बांधण्यात आलेल्या दोन पुलांचे लोकार्पणदेखील सिंह यांनी या वेळी केले. केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह, लष्करप्रमुख बिपीन रावत आणि उत्तर मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग उपस्थित होते, अशी माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.