भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज आणि उद्या दोन दिवस त्यांचे मुंबईत विविध कार्यक्रम होतील, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी शुक्रवारी दिली.
सुजितसिंह ठाकूर म्हणाले की, जे. पी. नड्डा यांचे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबई विमानतळावर आगमन होईल. तेथे कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत केले जाईल. आगमनानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. शनिवारी सायंकाळी भाजप कार्यालय, वसंतस्मृती, दादर येथे ते प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार तसेच अन्य बैठकांमध्ये मार्गदर्शन करतील.
दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी सकाळी दादर येथे चैत्यभूमीला अभिवादन करतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे भेट देऊन वंदन करतील. गुंडवली, अंधेरी येथे भाजपाच्या बूथ समितीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. तेथे त्यांच्या हस्ते भाजपाची सदस्यता नोंदणी करण्यात येईल आणि वृक्षारोपण करण्यात येईल. त्यानंतर नड्डा हे गोरेगाव, मुंबई येथे भाजप विशेष प्रदेश कार्यसमिती बैठकीचे उद्घाटन व मार्गदर्शन करतील. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहतील. भाजप प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांच्यासह पक्षाचे राज्यातील केंद्रीय पदाधिकारी आणि केंद्रीय मंत्री या बैठकीस हजर राहणार आहेत. भाजपचे राज्यातील सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, मंडल सरचिटणीस, खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय परिषद व राज्य परिषद सदस्य असे हजारो प्रतिनिधी विशेष कार्यसमिती बैठकीस उपस्थित राहणार आहेत.