मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक मुंबई भाजप अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांसह मुंबई भाजपचे मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांचंही लोढा यांनी कौतुक केलं. ‘शेलारांनी झाड लावलं आणि मी त्यांची फळ चाखणार आहे. या कार्यक्रमाला झालेली गर्दी शेलार यांच्यामुळेच झाली आहे’, असे लोढा यांनी सांगितले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ४८ तास आधी युती तुटल्याने आपण पंधराच जागा जिंकू शकलो. आता मात्र आधीपासूनच युती झालेली असल्याने मुंबईत ३६-० असा सामना आपण जिंकणार आहोत, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे. त्यांचं नेतृत्व केवळ राजकीय नाही तर विकासाची कामं करणारं नेतृत्व आहे,’ अशा शब्दांत मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर आज स्तुतीसुमनं उधळली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात शेलार आणि लोढा या दोघांचीही स्तुती केली. शेलार यांनी मुंबई भाजपला यशस्वी नेतृत्व दिलं. त्यांनी मुंबईत पक्ष लोकाभिमुख केला. त्यांच्यामुळेच मुंबईत भाजप नंबर वन पक्ष बनला, असे मुख्यमंत्री म्हणाले. लोढा हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. कुठलंही काम दिल्यास ते त्यात झोकून देतात. पक्षाने दिलेली नवी जबाबदारीही ते त्याच नेटाने सांभाळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ पैकी ३६ जागा भाजप-शिवसेना युती जिंकेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.