चोरट्यांनी घेतला “जस्ट डायल” चा असाही फायदा, कार किरायाने घेत केली लंपास,आरोपींना २४ तासात बेड्या

औरंगाबाद – दरोडेखोरांच्या नवीन टोळीने आपल्या कामाचा श्रीगणेशा “जस्ट डायल” या सेवेचा वापर करीत पुण्यातून लक्झरी कार कन्नड परिसरात मागवून लंपास केली. व चालक असलेल्या मालकाला लूटमार करत अंधारात सोडून दिले. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हेशाखेने तीन दरोडेखोरांना पाठलाग करुन २४ तासात अटक करत कार जप्त केली. या प्रकरणातील दोन आरोपी फरार झाले आहेत.
अरविंद प्रेमचंद राठोड, पंकज ब्रम्हदेव जाधव, व संदीप शिवलाल राठोड सर्व रा.कन्नड तालुका अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर भिक्कन ताराचंद पवार आणि अमरसिंग गंगू राठोड हे दोघे फरार झाले आहेत.
बाबासाहेब शिंदे(३९) रा.हडपसर पुणे यांना निकम नावाच्या इसमाने गेल्या बुधवारी वाळूज औद्योगिक परिसरात पुणे येथे परत जाण्यासाठी बोलावले.शिंदे यांच्या कडे होंडा मोबीलिओ ही कार आहे. शिंदे औरंगाबादेत आल्यानंतर वरील आरोपींनी गुरुवारी रात्री १२ वा. शिंदे यांना कन्नड येथे नेऊन सायगव्हाण मार्गे गौताळा अभयारण्याकडे नेले व खाली उतरवून मारहाण करंत मोबाईल व दीड हजार रु. हिसकावले व कार घेऊन पळ काढला. या प्रकरणी गुन्हा झाल्यानंतर खबर्याने दिलेल्या माहिती नूसार भिक्कन पवार याने वडगाव कोल्हाटी येथे येऊन शिंदे यांची कार एन.आर.बी. मैदानातील एका झाडाखाली लपवली.पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी पीएसआय भगतसिंग दुलंत यांच्या पथकासह आरोपींचा माग काढला.पोलिसांना पाहताच वरील पाचही आरोपी पळून जात असतांना तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले.वरील कारवाईत ६ लाखांची कार जप्त करण्यात आली. या कारवाईत संजय भोसले,शेख नदीम राहूल पगारे, बाबासाहेब नवले यांनी भाग घेतला होता.