Gadchiroli : नोकरदार महिलेची गळा चिरून हत्या

जिल्हा परिषदेच्या महिला लिपिकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. चंद्रप्रभा देवराव अप्पलवार (वय-32, रा. कारवाफा, ता. धानोरा) असे महिलेचे नाव आहे. मारेकऱ्याने चंद्रप्रभा हिची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात फेकला होता. या हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, चंद्रप्रभा अप्पलवार ही जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होती. चंद्रप्रभा ही नोकरीच्या निमित्ताने गडचिरोलीत एकटीच राहत होती. चंद्रप्रभा ही सोमवारी (१५ जुलै) कार्यालयात आली होती. परंतु नातेवाईक आल्याचे सांगून ती सायंकाळी चार वाजताच कार्यालयातून निघाली होती. मात्र, ती दुसऱ्या दिवशी कार्यालयात आलीच नाही. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी नवरगाव गावाजवळील पोहार नाल्यात तिचा मृतदेह आढळला.
चंद्रप्रभाचा मृतदेह पाण्यात कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने ओळख पटवण्यात बराच वेळ लागला. प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. पोटेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. चंद्रप्रभाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता नाल्यापासून काही अंतरावर तिची दुचाकी आढळली. प्रेम प्रकरणातून चंद्रप्रभाची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या पूर्ण प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.