Pakistan : कुख्यात दहशतवादी हाफिज सईदला अटक करून तुरुंगात पाठवले

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे परिणामी आर्थिक सुधारणा होण्यासाठी पाकिस्तानला जागतिक पातळीवरून मोठ्या प्रमाणावर मदतीची गरज आहे. मात्र, त्यासाठी पाकिस्तान सरकारने त्यांच्या देशातील दहशतवादी संघटना व व्यक्तींवर ठोस कारवाई करावी, असा दबाव येत आहे. फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सकडून पाकला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे . त्यामुळे आम्ही दहशतवाद्यांवर कारवाई करीत आहोत असा संदेश हाफिज सईदला अटक करून पाकिस्तानने देण्याचा प्रयत्न चालविला आहे.
दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेचा भाग म्हणून पाकिस्तानने मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला आज पाकिस्तानातील लाहोरमध्ये अटक केली असल्याचे वृत्त आहे . पाकच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी पथकानं हाफिजला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर त्याची रवानगी थेट न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दहशतवादाविरोधात भारतानं जागतिक पातळीवर निर्माण केलेल्या दबावाचं हे यश मानले जात आहे.
पाकिस्तानात सईद व त्याच्या संघटनेविरोधात २३ वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय दबावानंतर पंजाब पोलिसांनी अलीकडंच सईदविरोधात मनी लाँड्रिंग व दहशतवादी कारवायांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. लाहोरहून गुजरानवाला इथं जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं. या अटकेला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं हाफिजनं म्हटले आहे.
पंतप्रधान इम्रान खान लवकरच अमेरिकेचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठीच ही पावलं उचलली जात असल्याचे बोललं जात आहे. पाकिस्तानने काल भारतासाठी आपली हवाई हद्द खुली करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हाफिजच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.