हिंदुत्वाबद्दल राजकीय पूर्वग्रहातून गैरसमज पसरवले जातात ,हिंदुत्वाचे नीटपणाने आकलन करून सर्व समाजघटकांना सोबत घेण्याची गरज : खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

हिंदुत्व ही या देशातील आध्यात्मिक लोकशाही होय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित सामाजिक व आर्थिक लोकशाही अद्याप यावयाची आहे. त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हिंदुत्वाबद्दलचे गैरसमज दूर करून हिंदुत्वाचे नीटपणाने आकलन करून सर्व समाजघटकांना सोबत ठेवण्याची भूमिका ठेवली तरच हिंदुत्व उजळून निघेल, असे प्रतिपादन रविवारी येथे खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी ‘ हिंदुत्व’ हे पुस्तक लिहिले आहे. स. भु. शिक्षणसंस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीमध्ये सायंकाळी या पुस्तकाचे प्रकाशन करताना सहस्त्रबुद्धे हे ‘हिंदुत्व : संकल्पना आणि वर्तमानकाळाशी अनुबंध’ यावर बोलत होते. डॉ. मांडे यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली. मात्र त्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळे कधीच आयोजित केले नव्हते. ‘हिंदुत्व’या ग्रंथाचा मात्र आज प्रकाशन सोहळा संपन्न झाला. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन झाले. सरस्वती गीतानंतर आर. बी. पाटील यांनी प्रमुख पाहुणे राम भोगले व सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार केला. गोदावरी प्रकाशनच्या वृषाली मांडे यांनी महर्षी शिक्षण प्रसारक मंडळाचे एस. एम. कुलकर्णी व दत्तात्रय पदे यांचा सत्कार केला. पदे यांनी प्रास्ताविक केले.
विषयाची पुढे मांडणी करताना सहस्त्रबुद्धे म्हणाले की, हिंदुत्वाबद्दल राजकीय पूर्वग्रहातून गैरसमज पसरवले जात असतात. पण हिंदुत्वाबद्दलच्या आकलनाचा अनुशेष आज मराठवाड्याने या ग्रंथाच्या रुपाने भरून काढला. हिंदुत्व हे सलार्ड बाऊल होय. अस्मिता समाप्त करता येत नाहीत. त्या संकीर्ण असल्या तरी मोडू शकत नाही, असे सांगत, जो जे वांछील, तो ते लाहो, या दिशेने जायचं आहे.
गौतम बुद्ध, भगवान महावीर, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदुत्वातील उणिवा दाखविल्या. पण भारतीयांनी त्याकडे म्हणावं तसं लक्ष दिलं नाही. अठरापगड जातींमधील हिंदुत्वाचे धागे एकत्र करण्याची गरज आहे. हिंदुत्वाची व्यापकता पुढे आली पाहिजे. हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणत्व नव्हे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही कधी म्हटले नाही. त्यांनी ब्राह्मण्याविरुद्ध जरूर लढा पुकारला होता. आज समाजविघटनाचे, देश विघातकांचे आव्हान उभे असताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ठेवली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. सुलभा देशपांडे यांनी या सूत्रसंचालन केले तर डॉ.ज्ञानदा कुलकर्णी यांनी आभार मानले.