लढवय्या पँथर राजा ढाले यांचे निधन, आंबेडकरी चळवळीचा “राजा” गेला

आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचे मुंबईत अल्पशा आजाराने आज सकाळी त्यांच्या विक्रोळीतील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.ढाले यांच्या जाण्याने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व, आणि आंबेडकरी विचार चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना, चळवळीतील कार्यकर्ते आणि साहित्यिक व्यक्त करत आहेत.
राजा ढाले यांचे पार्थिव विक्रोळीतील गोदरेज रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांच्या कन्या गाथा ढाले यांनी दिली. ढाले यांच्या पार्थिवावर उद्या (१७ जुलै) दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असून उद्या दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे. ही अंत्ययात्रा विक्रोळीहून दादर येथील इलेक्ट्रीक स्मशानभूमी येथे दुपारी पोहोचणार आहे. राजा ढाले यांच्या निधनाचे वृत्त समजताच आंबेडकरी जनता आणि साहित्यक्षेत्रात दु:ख व्यक्त होत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाची वार्ता कळताच तीव्र शोक व्यक्त केला आहे. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे अशी शोकभावना व्यक्त करून आठवले यांनी राजा ढाले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानायक परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे.