ताजी बातमी : डॉ . बाबाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची निवड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी आज सोमवारी ही घोषणा केली.
डॉक्टर येवले यांची नियुक्ती पाच वर्षांच्या काळासाठी अथवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत ही नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चोपडे यांचा कार्यकाळ तीन जून २०१९ रोजी संपला होता त्यामुळे हे पद रिक्त झाले होते दरम्यान कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉक्टर येवले यांनी औषधी निर्माण शास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन संशोधन तसेच प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. जून २०१५ या वर्षी त्यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली होती विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनिल दवे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती गठीत केली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली या संस्थेचे संचालक प्रवीण कुमार तसेच शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे या निवड समितीचे सदस्य होते.