बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता दादाहरी चंदनशिवे यांच्या कुटुंबियांना ९५ लाखांची भरपाई

२०१५ मध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेले बीएसएनएलचे सबडिव्हिजनल इंजिनीअर दादाहरी चंदनशिवे यांच्या कुटुंबाला शनिवारी मोठा दिलासा मिळाला. भरपाईबाबतचा दावा तडजोडीअंती लोकअदालतीमध्ये निकाली काढत या कुटुंबाला तब्बल ९५ लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भरपाईचा चेकही कुटुंबाला तात्काळ देण्यात आला.
कळव्यात राहणारे सबडिव्हिजनल इंजिनीअर दादाहरी चंदनशिवे (४५) ३ एप्रिल २०१५ रोजी उस्मानाबादवरून गाडीने ठाण्याला येत होते. सोबत पत्नी आणि मुलगीदेखील होते. गाडी टोकावडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये दादाहरी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे. चंदनशिवे कुटुंबाने नुकसानभरपाईसाठी मोटार अपघात विमा प्राधिकरणाकडे धाव घेत दावा दाखल केला होता. शनिवारी ठाणे न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये विविध प्रकरणे ठेवण्यात आली होती.
या प्रकरणात चंदनशिवे कुटुंबाचेही प्रकरण होते. दादाहरी यांचा महिन्याचा पगार ८९ हजार रुपये होता. विमा कंपनीने मासिक मिळकतीच्या चौथा भाग भरपाई म्हणून देण्याचे ठरवले होते. विमा कंपनीच्या वतीने अॅड. अरविंद तिवारी आणि चंदनशिवे यांच्या बाजूने अॅड. सुरेंद्र सोनावणे यांनी बाजू मांडली. अखेर चंदनशिवे कुटुंब आणि ईफको टोकियो विमा कंपनी यांच्यातील तडजोडीअंती लोकअदालतीत हे प्रकरण निकाली काढण्यात आले. निकालानुसार चंदनशिवे कुटुंबाला ९५ लाखांची भरपाई देण्याचा निर्णय या अदालतीत घेण्यात आला. त्यामुळे चंदनशिवे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. भरपाईचा चेकही यावेळी तात्काळ देण्यात आला असून यावेळी जिल्हा न्यायाधीश एन. आर. बोरकर, ईफको कंपनीचे उपाध्यक्ष सनी भंडारी, व्यवस्थापक प्रदीप मोहन, मोटार अपघात विमा प्राधिकरणाचे सदस्य आर. एन. रोकडे, न्यायाधीश एच. एम. पटवर्धन उपस्थित होते. या लोकअदालतीत विविध सुमारे दोन हजार दावे १४ पॅनलद्वारे निकाली काढण्यात आले आहेत.