Tamil Nadu : बीफ च्या सूप चा फोटो फेसबुकवर टाकल्याने तरुणाला मारहाण , चौघांना अटक

गोवंश मांसाचे सूप पित असल्याचा फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे एका मुस्लिम तरुणावर काही जणांनी हल्ला केल्याची घटना नागापट्टणमजवळील एका गावात घडली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. पोरवचेरी येथे राहणाऱ्या मोहम्मद फैसन (२४) या तरुणाने गुरुवारी हा फोटो फेसबुकवर टाकला होता आणि पदार्थाच्या चवीचेही वर्णन केले होते. काही व्यक्तींनी त्याला आक्षेप घेतला आणि गुरुवारी रात्री फैसन याच्या घरी जाऊन त्याबद्दल जाब विचारला. त्यावेळी वादावादी होऊन त्यांनी फैसनवर हल्ला केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्यात फैसन जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक टी. के. राजशेखरन यांच्या आदेशानुसार, दिनेश कुमार (२८), अगाथियन (२९), गणेशकुमार (२७) आणि मोहनकुमार (२८) या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.