तिकिट रद्द करण्याच्या शुल्कातून रेल्वेला मिळाले १५३६.८५ कोटींचे उत्पन्न

तिकिट रद्द करण्याच्या शुल्कातून रेल्वेची चांगलीच कमाई झाली आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये तिकिट रद्द करण्याच्या शुल्कातून रेल्वेला १५३६.८५ कोटींचे उत्पन्न मिळाले. माहिती अधिकार कायद्यातंर्गत मागवण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी समोर आली आहे. आरक्षित तिकिट रद्द केल्यानंतर तिकिट रद्द करण्यासाठी रेल्वेकडून शुल्क आकारण्यात येते. प्रवास करण्याच्या तारखेपासून किती दिवस, तास आधी आरक्षित तिकिट रद्द करण्यात येते यावर हे शुल्क अवलंबून असते.
मध्य प्रदेशमधील नीमच येथील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांना ही माहिती मिळाली. रेल्वेने आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या शुल्कातून १५१८.६२ कोटी रुपये कमावले. तर, अनारक्षित तिकिट प्रणाली (युटीएस)द्वारे रद्द करण्यात आलेल्या तिकिटांमधून रेल्वेला १८.२३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. या माहिती अधिकार अर्जात तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात कपात करण्याच्या प्रस्ताव आहे का, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्याला रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नसल्याचे ही गौड यांनी सांगितले.