Pandharpur : लातूर जिल्ह्यातील भाविक दाम्पत्याला विठ्ठलाच्या महापूजेचा मान

लातूर जिल्ह्यातील अहमदनगरमध्ये तांडा येथे राहणारे प्रयाग आणि विठ्ठल मारुती चव्हाण हे दाम्पत्य गेल्या ३९ वर्षापासून पंढरपुरची वारी सातत्याने करतात. ३९ वर्षापासून वारी करत असलेल्या या दामप्त्यांना यंदा मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाच्या महापूजेचा मिळाला मान मिळाला आहे.
सांगवी सुनेवाडी तांडाचे वयवर्ष ६१ असणारे विठ्ठल चव्हाण हे १० वर्षे सरपंच होते. १९८० पासून अर्थात ३९ वर्षांपासून ते सलग वारी करीत आहेत. सध्या ते तंटामुक्त समितीचे सदस्य आहेत. त्यांना दोन मुले असून एक विवाहित मुलगी आहे. दोन्ही मुले पुणे येथे नोकरीस आहेत. ३९ वर्षापासूनची वारीची परंपरा, सलग वारी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाची महापूजा करण्याचा मान मिळाला. त्यामुळे आनंद झाला असून आमच्या गावाकडील नातेवाईकांना याची माहिती दिली. त्यांनाही खूप आनंद झाला. ”आमची दोन्ही मुले पुण्यात खाजगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतात. आमची गावाकडे पाच एकर शेती आहे. बागायत शेती होती. मात्र दुष्काळामुळे कोणतीही पिके नाहीत. महाराष्ट्रातला दुष्काळ नाहीसा व्हावा भरपूर पाऊस पडावा हीच विठ्ठल चरणी मागणी आहे.” , असे चव्हाण दाम्पत्याने सांगितले.
शासकीय पूजा सुरु होण्याच्या सुमारे दोन तास आधीच दर्शन मंडपाचे मुख्य प्रवेश व्दार बंद केले जाते. मंडपातून मंदिरात येणाऱ्या भाविकांमध्ये जे माळकरी भाविक आहेत. ज्यांच्या घरात वारीची परंपरा आहे. जे सहकुटुंब पायी वारी करतात असे भाविक पुकारले जातात. मंदिराच्या अतिशय जवळ आलेल्या अशा भाविक दांपत्याला महापूजेत सहभागी होण्याचा मान दिला जातो.