ICC WC 2019 AUS vs ENG Semi Final : इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला दणका, रविवारी न्यूझीलंडशी मुकाबला

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवीत आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत इंग्लंडला रविवारी न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे.२०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवीन विश्वविजेता मिळणार हे आता नक्की झालं आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने सामन्यात बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांनी सहज पूर्ण करुन दाखवलं.
जेसन रॉयने ८५ तर जॉनी बेअरस्टोने ३४ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी संयमीपणे फलंदाजी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
त्याआधी, यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकात २२३ धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने ८५ धावांची झुंजार खेळी केली. त्याला अलेक्स कॅरी (४६) आणि मिचेल स्टार्क (२९) यांनी चांगली साथ दिली. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ २२३ धावाच केल्या आणि इंग्लंडला २२४ धावांचे आव्हान दिले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण त्यांचा निर्णय काही प्रमाणात फसला. फिंच, वॉर्नर आणि हँड्सकॉम्ब हे तिघे अवघ्या १४ धावांत बाद झाला. पण स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. कॅरी ४६ धावांवर बाद झाल्यावर स्मिथने डाव पुढे नेला आणि ८५ धावांची झुंजार खेळी केली. पण दुसऱ्या बाजूने त्याला फलंदाजांची साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव २२३ धावांत आटोपला. ख्रिस वोक्स आणि आदिल रशिदने ३-३ तर जोफ्रा आर्चरने २ आणि मार्क वूडने १ गडी बाद केला.