ICC World Cup 2019 : न्यूझीलंड विरुद्ध जिंकण्याचा विराट कोहलीने दिला विश्वास

वर्ल्डकप उपांत्यफेरीच्या सामन्यात मंगळवारी भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमनेसामने उभे ठाकणार असून या सामन्याच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने विजयाचा विश्वास व्यक्त केला. भारतीय संघ पूर्ण आत्मविश्वासाने वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. प्रत्येक कसोटीच्या क्षणी संघाने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. उद्याच्या सामन्यातही जिंकण्याची इराद्यानेच आम्ही मैदानात उतरणार आहोत. तशी आमची व्यूहरचना असेल, असे विराट म्हणाला.
भारतीय गोलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. ज्या सामन्यात कमी धावा झाल्या त्या सामन्यात गोलंदाजांनी अचूक मारा करून सामना भारताच्या बाजूने झुकवल्याचे आपण पाहिलेच आहे. माझ्या मते सध्याचं आपलं गोलंदाजीचं आक्रमण जगातील सर्वोत्तम आक्रमण आहे. उद्याच्या नॉकआऊट सामन्यातही अशाच कामगिरीची आम्हाला अपेक्षा आहे, असे विराटने पुढे नमूद केले. उद्याच्या सामन्यात आम्हाला चांगला खेळ करावा लागेल. उद्या जो संघ चांगला खेळेल तोच जिंकेल, असेही विराटने पुढे म्हणाला.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाच शतके झळकावून विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या रोहित शर्माचे विराटने पुन्हा एकदा कौतुक केले. धोनीच्या नेतृत्वाखाली मी माझं क्रिकेटमधील करियर सुरू केलं. धोनीबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर राहिला आहे. धोनीही दिलदार आहे. मी जेव्हा जेव्हा त्याच्याकडे सल्ला मागितला तेव्हा त्याने मला उपयुक्त असे मार्गदर्शन केलेले आहे. खरंच धोनीसोबत खेळताना मी स्वत:ला नशीबवान समजतो, अशा शब्दांत विराटने धोनीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.