Aurangabad Crime : मराठवाड्यासह कोल्हापूर बुलडाण्यात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला अटक

वयाच्या बाराव्या वर्षात चोरीला सुरूवात केलेला चोरटा बावीसाव्या वर्षी टोळीचा प्रमुख झाला. अन् पाहता-पाहता त्याच्यावर दहा वर्षात ३६ वर गुन्हे दाखल झाले. या टोळीच्या म्होरक्याचा असलेल्या तेजासिंग नरसिंग बावरी याला स्थानिक गुन्हे शाखेने सिल्लोडमधील तीन जिनिंग मिलमधून १३ लाख ६९ हजार रुपये व ३०० अमेरिकन डॉलर पळविल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्यासह साथीदार तकदीरसिंग टिटुसिंग टाक याच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या दोघांकडून पोलिसांनी दोन जीपसह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
परभणी, जालना, औरंगाबाद, हिंगोली, बीड, कोल्हापुर, बुलढाणा आदी जिल्ह्यामध्ये तेजासिंगच्या टोळीने धुमाकूळ घातला. नुकताच त्याने जालना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंग गौर यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला चढवला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ३ जुलै रोजी सिल्लोडच्या अजिंठा रोडवरील हरिओम, पुनीत व शिवम कॉटन जिनिंगमध्ये मध्यरात्री तेजासिंग बावरी, तकदीरसिंग टाक यांच्यासह पाच ते सहा जणांच्या टोळीने चोरी करून १३ लाख ६९ हजार ९९४ व ३०० अमेरिकन डॉलर्स लांबवले. त्यांच्याबाबत जालना पोलिसांना ५ जुलै रोजी माहिती मिळाली. त्यावरुन जालना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. यानंतर दोघांनी संयुक्त कारवाई करत एका दारूच्या अड्ड्यावरुन तेजासिंग व तकदीरसिंग यांना पकडले. तेजासिंग याने वाशीम, कोल्हापूर आदी भागातही चोरी केल्या आहेत. चोरीसाठी निघताना वाटेत एखादी कार चोरून ती पुढील एका टप्प्यात सोडून द्यायची. त्यानंतर पुढे नवीन पुन्हा एखादी कार चोरून चोरी करायची, अशी टोळीची पद्धत असल्याचेही पाटील म्हणाल्या.
………
पोलिसांना १५ हजारांचे बक्षीस….
तेजासिंग बावरी या अट्टल गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आल्याने पथकाला अधीक्षक पाटील यांनी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांच्याकडून जांबिया, चाकू अशी प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांवर हल्ला करण्याची या टोळीची सवय असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
…….