Malegaon Bomb Blast : साध्वी प्रज्ञांची मोटरसायकल साक्षीदाराने ओळखली, न्यायाधीशांकडून पुराव्याची पाहणी

मालेगाव बॉम्ब स्फोटासाठी वापरण्यात आलेली साध्वी प्रज्ञांची मोटरसायकल साक्षीदाराने ओळखली आहे. कोर्टाखाली आणलेल्या टेम्पोत शिरून एनआयए एनआयए कोर्टाच्या न्यायाधीशांनी पुराव्याची पाहणीही केली. मोबाइल टॉर्चच्या मदतीने पुरावे तपासत असताना न्यायाधीश विनोद पाडाळकर यांच्या कपड्यांवर ग्रीसचे डाग पडले अशीही माहिती समोर आली आहे.
मोटरसायकल आणि इतर पुरावे एका टेम्पोत भरून कोर्ट परिसरात आणले होते. टेम्पोत पाळीपाळीने जाऊन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि न्यायाधीशांनी पाहणी केली. Freedom bike हा लोगो पाहून साक्षीदाराने ही गाडी ओळखली. मालेगाव स्फोटात या बाईकचा मागचा भाग पूर्णपणे नष्ट झाला होता. तर पुढचा भाग शाबूत आहे, आज आणलेल्या पुराव्यांमध्ये अनेक सायकल्सचाही समावेश होता. टेम्पोमध्ये जे पुरावे आहेत त्याची पाहणी साक्षीदार आणि मग न्यायाधीशांनी केली. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्ब स्फोटाचा कट रचण्याचा आरोप आहे. २००८ मध्ये झालेल्या मालेगावातील मशिदीजवळ स्फोट झाला होता. या स्फोटात ६ जण ठार झाले होते.
संघाचे प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येचाही आरोप प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आहे. दरम्यान मालेगाव स्फोट प्रकरणात प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित आणि दयानंद पांडे मुख्य आरोपी आहेत. आता या प्रकरणी एका साक्षीदाराने प्रज्ञा सिंह ठाकूर यांची स्फोटात वापरण्यात आलेली गाडी ओळखली आहे. यामुळे प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.