पक्षात कुणालाही घ्या , येण्यास बंदी नाही …महायुती असली तरी २२० जागा आपल्या आल्या पाहिजेत…आणखी काय म्हणाले रावसाहेब दानवे ?

लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशामुळे सध्या भाजपनेते फार्मात असून ‘पक्षात कुणालाही घ्या. येण्यास बंदी नाही. काँग्रेसच्या माजी आमदार, खासदाराजवळ बसलं की त्याला वाटतं कधी आपल्या भाजपमध्ये घेतोय , सध्या कुणीही भाजपमध्ये यायला तयार आहे. एका माजी महिला खासदाराला भेटलो आणि अंदाज घेतला. आता जिल्हा अध्यक्षाशी बोलतो आणि पक्षात घेतो,’ असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. ‘आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र लढतील. पण कार्यकर्त्यांना मात्र २८८ जागांवर काम करावं लागणार आहे. विधानसभेत आपल्याला २२० जागा जिंकायच्या आहेत. या निवडणुका १५ ऑक्टोबरच्या आतच होतील, असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे.
यावेळी बोलताना दानवे पुढे म्हणाले कि , ‘विरोधी पक्षातल्या एका माजी महिला खासदारासोबत भेट झाली आहे. जिल्ह्याध्यक्षांबरोबर बोलून त्यांना लवकरच भाजपमध्ये घेणार आहे,’ असा गौप्यस्फोटही रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेमकं कोण भाजपच्या संपर्कात आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे. ‘या निवडणुकीत मतदारसंघात गेलो नाही. बूथ वर गेलो नाही. फक्त मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. पण मी त्यातही गेलो नाही. कारण आजारी होतो. तरीही साडे तीन लाखांनी निवडून आलो. निवडणूक काळात फिरकलं नाही तरी काही फरक पडत नाही. कारण काम केलेलं असतं,’ असं म्हणत दानवे यांनी आपल्या निवडणूक विजयाचा फॉर्म्युला सांगितला.
आपल्या भाषणात दानवे यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला ते म्हणाले कि ‘काँग्रेसला आता अध्यक्ष मिळत नाही. काँग्रेसची स्थिती सध्या वाईट आहे. भाजपला मात्र अच्छे दिन आले आहेत. मोदींची लोकप्रियता, अमित शहा यांची रणनीती आणि कार्यकर्त्यांचे कष्ट यामुळे हे शक्य झालं. दुसरीकडे, काँग्रेसचे नेते रणांगण सोडून पळू लागले. चांगले दिवस असताना घरातला अध्यक्ष आणि वाईट दिवस असताना कुणी पण अध्यक्ष करायला तयार होतात, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी गांधी परिवारावरही टीका केली आहे.