जम्मू-काश्मीर : मिनी बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३३ प्रवासी जागीच ठार

जम्मू-काश्मीरमध्ये एक मिनी बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३३ प्रवासी जागीच ठार झाले आहेत. या दुर्घटनेत २२ जण जखमी झाले असून त्यांच्यापैकी अनेकजण गंभीर जखमी असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. या दुर्घटनेतील सर्व मृतांची ओळख पटली असून या ठिकाणी अद्यापही मदतकार्य सुरू आहे. आज सकाळी ७.३० वाजता हा अपघात झाला. ही मिनीबस केशवानहून किश्तवाडच्या दिशेने जात होती. अचानक एका वळणावर बस घसरली आणि दरीत कोसळली. त्यात ३३ प्रवासी ठार झाल्याचं किश्तवाडचे पोलीस उपायुक्त अंग्रेजसिंह राणा यांनी सांगितलं. या अपघातातील जखमींना स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच दरीतील आणखी जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचंही राणा यांनी सांगितलं.