मोदींच्या “मन कि बात ” : जल संकटावर मात करण्यासाठी देशाला दिला पाणी वाचवण्याचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम ‘मन की बात’ आजपासून पुन्हा एकदा सुरु झाला आहे. ‘देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्यासाठीच जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशा शब्दात भावना व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकालातील पहिल्याच ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी जल संरक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. सध्या देशाचा बहुतांश भाग जल संकटाचा सामना करत असल्यानं सर्वांनी जल संरक्षण करण्याची गरज असल्याचं आवाहन मोदींनी केलं. पाण्याचा प्रश्न हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पाण्याचा एक एक थेंब वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. असं मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी दिले तीन सल्ले …
1- ज्याप्रकारे देशवासियांनी स्वच्छता अभियानाला जनआंदोलनाचं रुप दिलं, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठी जन आंदोलनाची सुरूवात करायला हवी.
2- देशात पाण्याच्या संरक्षणासाठी अनेक पारंपरिक पद्धतींचा वापर गेल्या अनेक काळापासून होत आहे. जल संरक्षणाच्या या पारंपारिक पद्धती नागरिकांनी एकमेकांपर्यंत पोहोचवायला हव्यात.
3- जल संरक्षणाचं काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला किंवा संघटनेला जर तुम्ही ओळखत असाल तर नागरिकांना याबाबत माहिती द्यावी.
दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत असतात. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम होता.
लोकांचा सहभाग आणि सहाय्य यांच्या मदतीनं जल संकटावर मात करू, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. ‘जन, जन जुडेगा जल बचेगा’ असा संदेश त्यांनी दिला. देशात केवळ 8 टक्के पाणी वाचवलं जातं, पाण्याची समस्या जाणून त्यावर विचार करण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले.
चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे, कथा-कीर्तने अशा क्षेत्रात असलेल्या लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान चालवावे असे आवाहन केले. पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीनं घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. 22 जूनला देशातील हजारो ग्रामपंचायतींनी जल संरक्षणाचा संकल्प केल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी झारखंडच्या हजारी बागमधील एका सरपंचाचा संदेशदेखील ऐकवला. पाण्याच्या संरक्षणासाठी लोकांनी #JanShakti4JalShakti या हॅशटॅगचा उपयोग करत सोशल मीडियावर आपला मजकूर अपलोड करावा, असे आवाहनही त्यांनी लोकांनी केले.