Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : मुंबई शहर आणि उपनगरात आजही मुसळधार पावसाची शक्यता, देशात सर्वत्र वाढणार पावसाचा जोर

Spread the love

सलग दोन दिवस मुंबईला झोडपणाऱ्या पावसाचा धुमाकूळ आजही कायम राहणार आहे. आजही मुंबई-ठाण्यातील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊसपडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय मुंबईतील समुद्रात आज सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी ४.४ मीटरच्या लाटा उसळणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. आजही सकाळपासून मुंबईच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. येत्या २४ तासांत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, आज रविवार असल्याने पावसाचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईने चौपाट्यांवर गर्दी केली आहे. तर काही मंडळींनी सकाळीच पिकनिक स्पॉटच्या दिशेने कूच केली आहे. त्यामुळे चौपाट्या आणि पिकनिक स्पॉट गजबजून गेले आहेत. ३ जुलै रोजी पुन्हा एकदा मुंबई, ठाणे आणि पालघरमधील काही ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. सिंधुदुर्गातही मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा काही ठिकाणी अनुभव येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यात रविवार, मंगळवार आणि बुधवार या तीनही दिवशी घाट परिसरामध्ये मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुण्यातही बुधवारी एक-दोन ठिकाणी अशाच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाशी संबंधित घटनांमध्ये शनिवारी देशभरात २२ जण ठार आणि सात जण जखमी झाले. त्यामध्ये महाराष्ट्र व झारखंडमधील मृतांचा समावेश आहे. दरम्यान, गुजरातच्या दक्षिणेसह, नवी दिल्ली येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे जम्मू भागात उष्णतेची लाट असून शनिवारी पारा ४३.१ अंशांवर स्थिरावला होता.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुजरातमधील वळसाड, नवसारी, डांग, सुरत, नर्मदा, छोटा उधेपूर आणि बडोदे या जिल्ह्यांत पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मेघालय, छत्तीसगड, केरळ, कर्नाटकातील काही भाग, अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश आणि गोवा येथेही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ओडिसामध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, परंतु काही भागांत उन्हाच्या झळा होत्या. दरम्यान, देशातील काही भागांत उष्णतेची लाट असून, अमृतसरमध्ये ४२.४ अंश सेल्सियस, तर अंबालामध्ये ४१.८ अंश सेल्सयस तापमान नोंदविण्यात आले. उथ्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये ४४ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!