ICC World Cup 2019 : श्रीलंकेवर दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्ध सनसनाटी विजय मिळवणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. आफ्रिकेने श्रीलंकेचा ९ गडी राखून दणदणीत पराभव केला. दारूण पराभवामुळे श्रीलंकेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेला आता पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाला ५० षटकाचा खेळही करता आला नाही. श्रीलंकेचा संघ ४९.३ षटकात केवळ २०३ धावाच करू शकला. कुसाल परेरा (३०), आणि अविष्का फर्नांडो (३०) धावांच्या जोरावर श्रीलंकेने एक गडी बाद ६७ धावा केल्या. त्यानंतर प्रिटोरियसने श्रीलंकेला तीन जोरदार धक्के दिले. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था ३ बाद ७२ धावा अशी झाली. श्रीलंकेने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेने केवळ एका गड्याच्या बदल्यात हे आव्हान पूर्ण केले.
हाशिम आमला आणि फाफ डू प्लेसिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी रचून संघाला मोठा विजय मिळवून दिला. हाशिम आमलाने नाबाद ८० धावा तर फाफ डु प्लेसिसने नाबाद ९६ धावा केल्या. ड्वेन प्रिटोरियसने वेगवान गोलंदाजी करीत १० षटकात २५ धावा देऊन ३ गडी बाद केले. क्रिस मॉरिसला ३ तर कासिगो रबाडाला २ विकेट मिळाल्या. अँडील फेहलुकावायो आणि जेपी ड्युमिनीला प्रत्येकी एक गडी बाद केले. केवळ २५ धावा देऊन ३ गडी बाद करणाऱ्या ड्वेन प्रिटोरियसला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.