पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला, २५ जुलैपर्यंत कोठडी

भारतातून विदेशात पसार झालेला पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज ब्रिटनमधील कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळला असून त्याच्या कोठडीत २५ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत चारवेळा नीरवचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. नीरव मोदीला लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात आज व्हिडिओ लिंकच्या साह्याने हजर करण्यात आलं. यावेळी झालेल्या सुनावणीत त्याचा जामीन अर्ज फेटाळत कोर्टाने २५ जुलैपर्यंत त्याला कोठडी दिली. याआधी १२ जून रोजीही त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. नीरवला १९ मार्च रोजी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली असून तेव्हापासून तो कोठडीत आहे.
दरम्यान, ब्रिटनच्या कायद्यानुसार नीरवला प्रत्येक चार आठवड्यांनंतर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. २९ जुलैआधी पुन्हा एकदा त्याच्या कोठडीवर सुनावणी होणार आहे. या अनुशंगाने भारताची बाजू मांडत असलेल्या ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्विसला (CPS) ११ जुलैपर्यंत म्हणणं मांडावं लागणार आहे.