पतीच्या पबजीच्या वेडाला कंटाळून पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

पतीच्या पब्जीच्या वेडाला कंटाळून पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना अहमदाबादेतील हिरवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी कृष्णानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या पतीला पबजी खेळण्याचे व्यसन लागलं आहे. तो दिवसरात्र पबजी खेळण्यात मशगूल राहायचा. पबजीमुळे आठ वर्षांच्या मुलाकडे आणि पत्नीकडेही लक्ष द्यायचा नाही. मंगळवारी रात्रीही तो पबजी खेळण्यात मग्न होता. तेव्हा ‘तो मोबाइल बाजूला ठेवा आणि मला वेळ द्या’ अशी विनंती त्याच्या पत्नीने केली. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. भांडणांनंतर पतीने तिल जबर मारहाण केली. यामुळे चिडलेल्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण लगेच तिच्या सासरच्यांनी तिला वाचवलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.
महिलेची प्रकृती स्थिर असून पोलिसांनी रुग्णालयात जाऊनच तिची साक्ष घेतली आहे. दोन वर्षांपूर्वीही गृहहिंसेचा खटला या महिलेने दाखल केला होता. तेव्हा या दोघांचेही काउन्सिलिंग करून सामोपचाराने तो प्रश्न सोडवण्यात आला होता.