बिग बॉसः अभिजित बिचुकलेंचा जामीन फेटाळला

‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या पर्वातील सर्वात जास्त चर्चित स्पर्धक अभिजित बिचुकलेला कोर्टाने दणका दिला आहे. जामिनासाठी केलेला बिचुकलेचा अर्ज आज कोर्टाने फेटाळल्याने त्याचा बिग बॉसमधील परतीचा मार्ग बंद झाल्याची चर्चा आहे. बिचुकलेच्या विरोधातील खंडणीची तक्रार खुद्द तक्रारदारानेच मागे घेतल्याने त्याचा बिग बॉसच्या घरात परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा होती परंतु, आता ती फोल ठरल्याचे दिसत आहे.
‘बिग बॉस मराठी २’ मधील स्पर्धक अभिजित बिचुकलेला २१ जून रोजी एका जुन्या चेक बाऊन्सप्रकरणी थेट बिग बॉसच्या घरातून सातारा पोलिसांनी अटक केली होती. अटक करण्यात आल्यानंतर बिचुकलेवर आणखी एका खंडणी प्रकरणातही अटकेची कारवाई करण्यात आली. बिग बॉसच्या घरात गेल्यापासून बिचुकले सर्वात जास्त चर्चित स्पर्धक म्हणून ओळखला जातोय. चेक बाऊन्सप्रकरणात अडकल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या व्यक्तीने तक्रार मागे घेतल्याने बिचुकलेंना थोडाफार दिलासा मिळाला होता. पण आज कोर्टात सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने बिचुकलेचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याचा बिग बॉसमधील परतीचा मार्ग तुर्तास तरी बंद झाल्याचे दिसत आहे. अभिजीत बिचुकले मुंबईत बिग बॉस कार्यक्रम संपल्यावर फरार होऊ शकतो, असे कारण देत सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने अभिजीत बिचुकलेचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
पहिल्या दिवसापासून अभिजीत बिचुकले विविध गोष्टींमुळे चर्चेत होते. त्यामुळे शोच्या टीआरपीसाठी बिग बॉसची टीम त्याला परत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. बिचुकलेला अटक झाल्यापासून बिग बॉसची टीम साताऱ्यात ठाण मांडून बसली आहे. परंतु, कोर्टाने आज जामीन फेटाळल्याने बिचुकलेसह बिग बॉसच्या टीमला धक्का बसला आहे.