पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण , झाडे कोसळली , विजेच्या धक्क्याने तिघांचा मृत्यू

पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली आहे. शॉक लागल्याने तीन जण मृत्युमुखी पडले आहेत, तर पाच ठिकाणी झाडे कोसळली आहेत. दरम्यान, मुंबईसह कोकणात मान्सूनला पोषक स्थिती सक्रीय झाल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हीच पावसाची स्थिती पुढील २४ तास कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
शहर व उपनगरात पावसामुळे ९ ठिकाणी शॉर्ट सर्कीटच्या घटना घडल्या आहेत. आज पहाटे ७.४८ च्या सुमारास अंधेरी पश्चिमेला आरटीओ ऑफिससमोर काशीमा युडियार ही ६० वर्षे वयाची वृद्ध महिला विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्व येथे इरवानी इस्टेटजवळ शॉक लागून चार जण जखमी झाले. त्यापैकी दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र यादव (६०) आणि संजय यादव (२४) अशी मृतांची नावे आहेत. आशादेवी यादव ही पाच वर्षीय मुलगी आणि दीपू यादव (२४) या दोघांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबईसह कोकणात पुढील २४ तास पाऊस असाच जोरदार बरसत राहणार आहे आणि त्यानंतर हळूहळू त्याची तीव्रता कमी होत जाणार आहे. मुंबईत पुढील २४ तास शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. पुढील ४८ तास मुंबईत शहर आणि उपनगरात पावसाची संततधार कायम राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.