धक्कादायक : मुलगा होत नाही म्हणून स्वत:च्या पाचही मुलींची हत्या करून महिलेनेही केली आत्महत्या

मुलगा होत नाही म्हणून स्वत:च्या पाचही मुलींना पाण्याच्या टाकीत ढकलून त्यांची हत्या करून एका महिलेने स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना राजस्थानच्या बाडमेरमध्ये घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रत्येकवेळी मुलगी होत असल्याने ही महिला सतत तणावाखाली राह्यची त्यामुळेच तिने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. बाडमेरमधील चौहटन येथे ही घटना घडली. वानू देवी (वय ४२) असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने तिची मुलगी संतोष (वय १३), ममता (वय ११), नैना (वय ९), हमसा (वय ७) आणि हेमलता (वय ३) यांना पाण्याच्या टाकीत ढकलून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:ही पाण्याच्या टाकीत उडी मारून जीव दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
वानू देवीचा विवाह २० वर्षांपूर्वी झाला होता. त्यांचे पती शाळेत क्राफ्ट टीचर आहेत. एक मुलगी झाल्यानंतर मुलगा होईल अशी तिला आशा होती. मात्र पाच मुली झाल्या तरी तिला मुलगा न झाल्याने ती तणावात होती. पती कामावर गेल्यानंतर ती मुलींना पाण्याच्या टाकीजवळ घेऊन गेली आणि पाचही मुलींना पाण्याच्या टाकीत ढकललं. त्यानंतर स्वत: पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.