Loksabha 2019 : तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी जेंव्हा संसद गाजवली ….

तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा संसदेत निवडून आलेल्या महुआ मोइत्रा यांनी मंगळवारी लोकसभेत जोरदार भाषण केले. आपल्या दहा मिनिटांच्या भाषणाने त्यांनी लोकांवर छाप पाडली. जे.पी. मॉर्गनमध्ये काम केलेल्या आणि बँकिंग क्षेत्राचा अनुभव असलेल्या महुआ यांनी २००८ मध्ये राजकारणात पाऊल ठेवले आहे. आपल्या भाषणात त्यांनी भाजप सरकारवर खरमरीत टीका केली. बेरोजगारी, फेक न्यूज, माध्यम स्वातंत्र्या, शेतकरी, राष्ट्रवाद आदी विषयांवर त्यांनी भाजप सरकारवर शरसंधान केलं. २०१९ ची संपूर्ण निवडणूक भाजपने व्हॉट्स अप आणि फेक न्यूजवर लढली असे सांगता भाजप सरकारचा उल्लेख त्यांनी हुकुमशाही सरकार असा केला.
प. बंगालच्या कृष्णानगरमधून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर महुआ मोइत्रा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी भाजपच्या कल्याण चौबे यांचा सुमारे ६३ हजार मतांनी पराभव केला. महुआ यांनी २००८ मध्ये राजकारण प्रवेश केला ते काँग्रेस पक्षातून. मात्र लवकरच त्या काँग्रेसला कंटाळल्या आणि त्यांनी २०१० मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जींनी त्यांना २०१६ मध्ये करीमपूर विधानसभेचं तिकीट दिलं आणि त्या विजयी झाल्या. हायप्रोफाइल लाइफस्टाइलमुळे ग्राउंडवर्क करण्याच्या त्या योग्यतेच्या नाहीत अशी टीका सुरुवातीला त्यांच्यावर झाली. पण करीमपूरच्या विजयाने लोकांची तोंडं बंदं केली.