ICC World Cup 2019 IND vs WI : विंडीजविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात भारताचा १२५ धावांनी विजय, विराट कोहली सामनावीर

भारताने विंडीजविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात १२५ धावांनी विजय मिळवला. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विंडीजपुढे २६८ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे सपशेल शरणागती पत्करली. या विजयासह भारत या स्पर्धेत अजूनही अजिंक्य आहे. आजच्या विजयाने टीम इंडियाने ११ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी उडी घेतली आहे. तर विंडीजचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. विराट कोहलीला सामनावीर घोषित करण्यात आले.
२६९ धावांचा पाठलाग करताना धोकादायक ख्रिस गेल मोठा फटका खेळून माघारी परतला. त्याने अत्यंत संथ खेळ करत १९ चेंडूत ६ धावा केल्या. लगेचच मोहम्मद शमीने शाय होपचा त्रिफळा उडवला आणि विंडीजला दुसरा धक्का दिला. होपने १० चेंडूत ५ धावा केल्या. पाठोपाठ हार्दिक पांड्यानेही विंडीजची जमलेली जोडी फोडली त्याने अँब्रिसला ३१ धावांवर माघारी धाडले. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पूरन बाद. विंडीजचे खेळपट्टीवर जम बसवलेले दोन्ही फलंदाज माघारी परतले. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पूरन बाद झाला. विंडीजचे खेळपट्टीवर जम बसवलेले दोन्ही फलंदाज माघारी परतले. पूरनने २८ धावा काढल्या. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर युझवेन्द्र चहलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने १३ चेंडूत ६ धावा केल्या. मागच्या सामन्यात तुफानी खेळी करणारा ब्रेथवेट आणि पुढच्याच चेंडू फॅबियन ऍलन असे बुमराहने २ चेंडूवर २ बळी टिपले. त्यानंतर त्यांच्या डावाला गळती लागली आणि भारताने सामना सहज जिंकला.
प्रारंभी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने फलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अत्यंत सावध सुरुवात केली. पण रोहितने फटकेबाजी करण्यास सुरुवात करताच केमार रोचने त्याचा अडसर दूर केला. भारताचा रोहित शर्मा १ चौकार आणि १ षटकार खेचून १८ धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा स्वस्तात बाद झाल्यावर विराट कोहलीच्या साथीने सलामीवीर राहुलने सावध खेळ करण्यास सुरुवात केली आणि ११ व्या षटकात भारताचे अर्धशतक साकारले.
सलामीवीर लोकेश राहुलचे अर्धशतक मात्र २ धावांनी हुकले. त्याने ६ चौकार लगावत ६८ चेंडूत ४८ धावा केल्या. पण कर्णधार जेसन होल्डरने त्याला त्रिफळाचीत केले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेला विजय शंकर १४ धावांवर बाद झाला. यात त्याने ३ चौकार खेचले होते. पण केमार रोचने त्याला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले. या दरम्यान कॅप्टन कोहलीने ५६ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकले. विराटचे कोहलीने अर्धशतक केल्यानंतर लगेचच केदार जाधव माघारी परतला. १० चेंडूत त्याने केवळ ७ धावा केल्या. या खेळीत त्याने १ चौकार लगावला. पण विजय शंकर प्रमाणेच केदारदेखील केमार रोचच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षकाकडे झेल देत बाद झाला.
धोनी आणि विराट यांच्यात भागीदारी होत असताना कर्णधार कोहली तंबूत परतला. धोनीच्या संथ खेळीमुळे विराट कोहलीला फटकेबाजी करणे क्रमप्राप्त ठरले. तशातच तो फटका खेळून बाद झाला. त्याने ८ चौकार खेचत ८२ चेंडूत ७२ धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्याने धमाकेदार ३८ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. पण अर्धशतकाने त्याला हुलकावणी दिली. अखेर धोनीने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले आणि भारताला २६८ धावांपर्यंत मजल मारून दिली.