Hariyana : काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या

हरियाणात काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी फरिदाबाद येथे काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. विकास चौधरी आपल्या कारमधून प्रवास करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेल्या विकास चौधरी यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास चौधरी जीममधून बाहेर आले असता काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. विकास चौधरी आपल्या गाडीत बसले असताना त्यांच्यावर आठ ते दहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर नेमके कोण होते याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. काँग्रेस नेत्यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. हरियाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी सध्या राज्यात जंगलराज असल्याची टीका केली. ‘सध्या जंगलराज सुरु आहे. कायद्याची कोणतीही भीती नाही. अशीच घटना काही दिवसांपुर्वी घडली होती जेव्हा छेडछाडीला विरोध केल्याबद्दल महिलेची हत्या करण्यात करण्यात आली होती. यासंबंधी तपास झाला पाहिजे’, अशी मागणी त्यांनी केली आहे.