भारताच्या आयात धोरणावर डोनाल्ड ट्रम्प नाराज , धोरण रद्द करण्याचा आग्रह

भारताच्या आयात वस्तूसंबंधी धोरणावर सतत आगपाखड करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पयांनी भारत आकारत असलेल्या आयात शुल्काला पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शवला आहे. आमचा विरोध असताना भारताने पुन्हा आयात शुल्कात वाढ केली, हे स्वीकारण्याजोगे नसून हे धोरण रद्द व्हायलाच हवे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या साठी आपण भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भारताच्या आयात शुल्क धोरणाबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारत अमेरिकेवर मोठे आयात शुल्क आकारत आला आहे. काही दिवसांपूर्वी भारताने पुन्हा आयात शुल्कात वाढच केल्याचे दिसत आहे. या बाबत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपण बोलणार असल्याचे ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. भारताचे आयात शुल्काबाबतचे धोरण मुळीच स्वीकारार्ह नसून ते रद्द केलेच पाहिजे अशी ठाम भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही ट्रम्प यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. ‘भारताने अमेरिकेच्या काही वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर आयात शुल्क अवलंबले आहे. हर्ले डेव्हिडसन मोटरसायकल व अन्य काही उत्पादनांवर भारताकडून जबर शुल्क आकारले जाते. याविषयी मी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे व त्यांनी या शुल्कात कपात करण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे ट्रम्प म्हणाले होते. भारताला टेरिफ किंग असे नक्कीच म्हणता येईल व मला खूश करण्यासाठीच भारत अमेरिकेशी व्यापार करार करू पाहात आहे,’ असा दावाही ट्रम्प यांनी त्यावेळी केला होता.
I look forward to speaking with Prime Minister Modi about the fact that India, for years having put very high Tariffs against the United States, just recently increased the Tariffs even further. This is unacceptable and the Tariffs must be withdrawn!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) June 27, 2019