ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडला पराभूत करून ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

पाच वेळा विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने विश्वचषक २०१९ मध्ये यजमान इंग्लंडवर ६४ धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. कर्णधार फिंचच्या शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने २८५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेन स्टोक्सने एकाकी ८९ धावांची झुंज दिली, पण जेसन बेहेरनडॉर्फने टिपलेल्या ५ बळींमुळे इंग्लंडला केवळ २२१ धावांपर्यंतच मजल मारता आली. १२ गुणांसह उपांत्य फेरीचे तिकीट मिळवणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला आहे, तर पराभवामुळे इंग्लंडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
२८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिन्स (०), रूट (८) आणि मॉर्गन (४) हे तिघे झटपट बाद झाले. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण बेअरस्टो देखील २७ धावा काढून माघारी परतला. स्टोक्सने जोस बटलरच्या साथीने चांगली खेळी केली. बटलर मोठा फटका मारताना २५ धावांवर बाद झाला. पण स्टोक्सने फटकेबाजी सुरूच ठेवली. या दरम्यान त्याने दमदार अर्धशतक ठोकले. ८९ धावांवर खेळत असताना मिचेल स्टार्कच्या यॉर्कर चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ८ चौकार आणि २ षटकार खेचले. त्यानंतर आलेल्या ख्रिस वोक्स (२६) आणि आदिल रशीद (२५) यांनी काही काळ खेळपट्टी सांभाळून पराजय पुढे ढकलला, पण अखेर बेहरनडॉर्फच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचा डाव २२१ धावांवरआटोपला. बेहेरनडॉर्फने ५, स्टार्कने ४ तर स्टोयनीसने १ बळी टिपला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच या दोघांनी दमदार फलंदाजी करत भक्कम सलामी दिली. १२३ धावांच्या सलामी भागीदारीनंतर वॉर्नर बाद झाला. त्याने ६१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याच्यानंतर फिंचने ख्वाजाच्या साथीने डाव पुढे नेला, पण ख्वाजा २३ धावा करून माघारी परतला. स्टोक्सने त्याच्या त्रिफळा उडवला. फिंचने मात्र दमदार शतक ठोकले. त्याने ११६ चेंडूत १०० धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ही खेळी सजवली. पण मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला.स्टीव्ह स्मिथने एक बाजू लावून धरली. पण दुसऱ्या बाजूने त्याला कोणी साथ देऊ शकले नाही. धोकादायक मॅक्सवेल १२ धावा काढून बाद झाला. पाठोपाठ स्टॉयनीसदेखील धावचीत होऊन माघारी परतला. अखेर शेवटच्या टप्प्यात स्मिथ फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने ३८ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला २८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडकडून वोक्सने २ तर आर्चर, वुड, स्टोक्स आणि अली यांनी १-१ बळी टिपला.