अहमदनगर जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सततचा दुष्काळ, नापिकी यामुळे वाढत जाणाऱ्या कर्जाला कंटाळून तालुक्यातील साकत येथील चंद्रकांत शंकर अडसुळ (वय ५५) या शेतकऱ्याने बुधवारी शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. चंद्रकांत अडसुळ यांच्यामागे आई, भाऊ, पत्नी, मुलगा व विवाहित मुली असा परिवार आहे.
सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात अत्यल्प उत्पन्न मिळत होते. यात खाण्याचेही भागत नव्हते. यातच दोन वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. पण दोन वर्षांपासून नापिकीमुळे ते कर्ज फेडू शकले नव्हते. सेंट्रल बँक व सेवा संस्थेचेही कर्ज त्याच्यावर होते. वाढत जाणारा कर्जाचा डोंगर व सततची नापिकी यामुळे ते मागील काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. यातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. बुधवारी (२६ जून) सकाळी ते शेतातून दूध घेऊन घरी आले. दूध डेअरीत घातल्यावर शेतात जातो म्हणून ते गोठ्यात गेले व गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात आली.